मुंबई : सध्या राज्यात कोरोना परिस्थिती अत्यंत तणावाच्या वळणावर पोहोचली आहे. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण आला आहे. अशातच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळा ऋतू सुरु होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावत ती पूर्णत्वास नेणंही तितकंच गरजेचं आहे. हीच परिस्थिती जाणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात मान्सूनपूर्व तयारीची कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 


साथरोग नियंत्रणासोबतच नालेसफाईसाठीही आवश्यक त्या उपाययोजना करत नियोजनबद्ध पद्धतीनं कामं पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. एका ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शहरातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि इतरही काही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. 


खासगी कंपनीतील 123 कर्मचाऱ्यांचे बोगस कोरोना अहवाल तयार करणाऱ्या दोन लॅबमालकांना अटक


नालेसफाईसोबतच नाले खोलीकरण, रुंदीकरण करत त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढवणं, महामार्ग आणि पदपथांच्या बाजूला असणारं डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावणं अशा संदर्भातील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. याशिवाय सध्या सुरु असणाऱ्या कोस्टल रोड आणि मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या.