मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्र आहेत. या नव्या आघाडीमुळे विरोधक असलेल्या अनेक नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं दिसत आहे. एकेकाळी एकमेकांवर तोफ डागणारे कट्टर विरोधक आता एकमेकांची उघडपणे स्तुती करण्यात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अजित पवार हे एक चांगले सहकारी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.


उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, अजित पवार हे नक्कीच एक चांगले सहकारी आहेत. समाजातील महत्त्वाच्या विषयांची त्यांना जाण आहे. अजित पवार प्रशासक म्हणून उत्तम नेते आहेत, अभ्यासू आहेत. एक सहकारी म्हणून त्यांची मला मदत मिळते. आम्ही एकत्र नव्हतो त्यावेळी ते आमचे विरोधक होते. ते कितीही लपवून ठेवलं तरी लपून राहणार नाही. विधानसभा निवडणुकीतही आम्ही एकमेकांवर सडकून टीका केली. मात्र आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये कामं करताना आम्ही एकमेकांना सांभाळून घेत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


शरद पवार त्यांच्या अनुभवाने मार्गदर्शन करतात


या सरकारला बाप किती आणि रिमोट कंट्रोल कुणाकडे? या प्रश्नाचं उतर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, बाप एकच असतो आणि आईही एकच असते. रिमोट कंट्रोल वैगरे असा काही प्रश्न नाही. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. शरद पवारांबद्दल बोलायचं तर ते सुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत. त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो. पण त्यांचंसुद्धा एक वैशिष्ट्य आहे, त्यांना एखादी गोष्ट नीट समजावून सांगितली तर एका क्षणात ते म्हणतात, ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


संबंधित बातम्या


सीएएबाबत गैरसमज, मात्र एनआरसी हिंदूंसह सर्व धर्मियांच्या मुळावर येणार, आम्ही तसं होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे


बुलेट ट्रेन आमचं स्वप्न नाही, तो पांढरा हत्ती, त्याला पोसणं गरजेचं नाही : मुख्यमंत्री


कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क, दोन लाखांवरची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क, दोन लाखांवरची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे