मुंबई : निसर्ग चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत समुद्रकिनारी धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुंबई ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील सर्वच नागरिकांनी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचं आहे. या चक्रीवादळाचा वेग अंदाजे सव्वाशे किलोमीटर असण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.


जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा. चक्रीवादळ जवळपास सव्वाशे किमीच्या वेगाने धडकेल, त्यासोबत पाऊसही असेल. निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं असून अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मोठं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एनडीआरएफच्या 15 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभागही सज्ज आहे. कोरोना संकट थोपवून धरलं तसं वादळाचं संकट आपण परतवून लावू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून त्यांना घरी सुखरुप परत आणण्यात आले आहे. पालघरच्या मच्छिमार बांधवांशीही संपर्क झाला आह, तेही परत येत आहेत. पुढील दोन दिवस किंवा पुढची सूचना येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असेही मुख्यमंत्री यांनी सांगितलं. सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंतच्या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपर्क साधल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली. केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे जी काही मदत लागेल ती करु. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अमित शाह यांनीही मदतीचं आश्वासन दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आवाहन केलं?


- प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, आवश्यक औषधे-गोळ्या सोबत ठेवा
- मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरांमध्ये राहू नका
- तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा
- घराची दारं आणि खिडक्या बंद ठेवा
- वादळाच्या काळात सगळी इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवा
- विद्युत तार, खांब यांपासून दूर राहा
- मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा
- पिण्याच्या पाण्याचा साठा करुन ठेवा
- समुद्रात किंवा किनाऱ्यावर जाऊ नका
- जनावरं प्राण्यांना बांधून ठेऊ, नका त्यांना मोकळं सोडा