मुंबई : कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती.  मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,  देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंत कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लग्नसराई सुरू झाली की 'यायच हं!' असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. माता भगिनींना परत सांगतो, आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून केला आहे. तो का करावा लागला? त्याची कारणे आहेत. आपल्याकडे सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे. कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.