मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार बनले आहेत. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार बनले. शिवाय ते कॅबिनेट मंत्रीही बनले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. तर भाजपकडून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके रमेश कराड आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथग्रहण केली. भाजपचे गोपीचंद पडळकर हे शपथविधीसाठी धनगरी वेशात आले होते. विधानपरिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली.
अवघ्या 10 मिनिटात शपथविधीची प्रक्रिया पार पडली. या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय अस्थिरताही संपली आहे.
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत अखेरच्या दिवशी 13 पैकी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. 13 उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भाजप), संदीप सुरेश लेले (भाजपक्ष), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस) या चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेस
शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी
काँग्रेस
राजेश धोंडीराम राठोड
भाजप
गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड