मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री (17 मे) निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


राष्ट्रीय पुरस्कार विजेते रत्नाकर मतकरी यांना गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारादरम्यान रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


रत्नाकर मतकरी यांनी 1955 मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाची सुरुवात केली. ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रसारित झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु झालेला लेखनाचा प्रवास 81 व्या वर्षापर्यंत अव्याहतपणे सुरु होता. दररोज दोन तास ते लेखन करायचे.


नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं. इतकंच नाही तर बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून अनेक बालनाट्यांची निर्मितीही केली होती. अलीकडेच 'अलबत्या गलबत्या' आणि 'निम्मा, शिम्मा राक्षस' या मुलांच्या, तसंच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारित 'आरण्यक' ही नाटकं रंगभूमी अतिशय गाजली.


'लोककथा ७८, दुभंग, अश्वमेध, माझं काय चुकलं?, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, घर तिघांचं हवं, खोल खोल पाणी, इंदिरा यासह काही अन्य नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर गूढकथा हा कथाप्रकारही त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला.


गहीरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी या मालिका, तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट इन्वेस्टमेन्ट, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकांच्या पसंतीस उतरली.


Ratnakar Matkari passed away | ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन