Ashish Shelar on Nawab Malik : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. मलिक यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप मान्य केले असल्याचा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करावा आणि चौकशी करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. 


नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्याविरोधात हल्लाबोल केला. राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा शेलार यांनी केला. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब यांनी मान्य केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे नवाब मलिक सांगत आहेत असेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला.  


अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध झाकण्यासाठी चांडाळचौकटी काम करत असून  मुंबई 1993 बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत मलिक यांचे संबंध असल्याचे शेलार यांनी म्हटले. राज्याचे मंत्री आरोपांची कबुली देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयर दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शेलार यांनी केली. 


फडणवीस यांनी काय आरोप केले?
नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणावरील तीन एकर जमीन फक्त तीस लाखात कशी घेतली? ज्या लोकांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन घेतली ते 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मलिकांनी जमीन कशी विकत घेतली, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील जागेशिवाय मलिकांनी अन्य चार ठिकाणीही मलिकांनी स्वस्तात जमीन खरेदी केली आहे. या जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात आहे. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असे फडणवीस यांनी म्हटले. 


संबंधित वृत्त:


नवाब मलिकांचे अंडर्वल्डशी संबंध, शरद पवारांकडे पुरावे देणार, देवेंद्र फडणवीसांचे 5 मोठे हल्ले


उद्या सकाळी दहापर्यंत थांबा, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार, नवाब मलिकांनी वात पेटवली