मुंबई: चिथावणीखोर भाषणं करुन मुस्लिम तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करणाऱ्या झाकीर नाईकच्या भाषणांची चौकशी करुन तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळं झाकीर नाईकच्या चौकशीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
बांग्लादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यानं आपल्याला झाकीर नाईककडून प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आयबीनंही झाकीरविरोधात मोहीम उघडली होती.
बांग्लादेशातील ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांनी आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणांमधून जिहादची प्रेरणा मिळाल्याचं जाहीर केलं होतं.
विशेष म्हणजे, हैद्राबादमधील आयसिसचा म्होरक्या इब्राहीम यजदा यानेसुद्धा झाकीर नाईकच्या शिबिरामध्ये 10 दिवस वास्तव्य केले होते. त्यामुळं झाकीर नाईकची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
झाकीर नाईक स्वत:ला मुस्लीम स्कॉलर समजतो. इतकंच नाही, तर देशभरात तरुणांची शिबिरं घेऊन तो कट्टरवादासाठी त्यांना प्रेरीत करतो. यू ट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगवर साइटवर नाईकचे लाखो फॉलोअर्स आहेत.