मुंबई : पारदर्शी कारभाराचा अजेंडा मिरवणाऱ्या भाजपचा अपारदर्शी कारभार समोर आला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून किती परदेश दौरे केले, त्याचा किती खर्च झाला, त्यांनी किती कार्यक्रमांना हजेरी लावली, किती वेळ मंत्रालयात होते याबाबत कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात येत नाही आहे.


गेल्या एक वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे याबाबत विचारणा करत आहेत. मात्र त्यांना काहीच माहिती मिळालेली नाही. याबाबत माहिती आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यातच सामान्य प्रशासन विभागाला माहिती देण्याचे आदेश दिले. मात्र माहिती उपलब्ध नाही, असं सांगत ती देण्याचं टाळलं जात असल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर किती परदेश दौरे केले, किती दिवस, तास काम केलं आणि सुट्टी घेतली. ही सर्व माहिती नुकतीच माहिती अधिकारामधून मिळाली. पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भातील लेखाजोखा अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

वास्तविक, मुख्यमंत्री कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभाग एकमेकांवर माहिती देण्याची जबाबदारी ढकलत आहेत. राज्य सरकारचे हे दोन्ही विभाग महितीच्या अधिकाराखली येऊन देखील, मुख्यमंत्र्यंबाबत ही माहिती का लपवली जाते आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.