मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांशी मुख्यमंत्री सहमत असून, मागण्यांना विरोध नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांसोबतच्या 'वर्षा'वरील बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. शिवाय, यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात शांततेने निघणाऱ्या मराठा समाजाच्या मूक मोर्चांचे अभिनंदनही केले.


 

गेल्या एक महिन्यापासून राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या विराट मोर्चांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबतं झाली. यावेळी आमदार, खासदार, समाजातील काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते.

 

"मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मराठा समाजाच्या मोर्चांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांततेने निघणाऱ्या मोर्चांचे अभिनंदन केले आणि मराठा समाजाच्या मागण्यांशी सहमती दर्शवली. शिवाय, या मागण्यांबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचंही सांगितलं.", अशी माहिती रावसाहेब दानवेंनी बैठकीनंतर दिली.

 

आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपनं सावधपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

 

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर अस्वस्थ झालेला मराठा समाज अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या, अशा प्रमुख मागण्या करत रस्त्यावर उतरला.

 

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 32 टक्के समाज मराठा आहे. त्यामुळे या संतापाचे राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही सहन करावे लागण्याची चिन्हं आहेत.

 

कुठे कुठे मोर्चे निघाले?

औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट) बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर) या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाने विराट मोर्चा काढला होता.

 

कुठे मोर्चे निघणार?

तर नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), सोलापूर, नवी मुंबई (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), पुणे (25 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.