मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठा क्रांती मोर्चावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांच्या असंतोषाला आणि चिघळलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ही बाब खेदजनक असल्याचे पवारांनी म्हटलं आहे.


मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही


"मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी कधीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचू दिला नाही. मात्र आंदोनलानाची दखल न घेतली गेल्याने काहींनी आत्महत्येचा मार्गही स्वीकारला. मात्र राज्य सरकारने योग्य ती दखल न घेतल्याने आता उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलनात सहभागी महत्त्वाच्या घटकांना त्वरीत बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा आणि यातून मार्ग काढावा", असा सल्लाही शरद पवारांनी दिला आहे.


मंत्र्याच्या वक्तव्यांमुळे आंदोलन चिघळलं


"2014 ते 2016 या दोन वर्षातील शेतकरी आत्महत्यांमध्ये 42 टक्के आत्महत्या मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आहे. शेतीमालास भाव देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं. यातून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढत गेलं आणि परिणामी कर्जाचा डोंगर वाढत गेला. सरतेशेवटी आत्महत्या असा चक्रात हा समाज सापडला आहे. या परिस्थितीत तरुणांना सर्वाधिक फटका बसला आणि यातून आरक्षणाची मागणी पुढे आली. तरुणांनी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. मात्र 'आम्ही सगळ काही केलेले आहे' अशी विधाने सरकारच्या मंत्र्यांकडून आली आणि विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेली विधानांमुळे मराठा तरुमांमध्ये संताप वाढला", असा आरोप शरद पवार यांनी केला.


...म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर : पवार


"अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलण्याची गरज होती. मात्र विठ्ठ्ल पूजेच्या निमित्ताने वारकऱ्यांना त्रास होईल अशी साप सोडण्याची विधाने त्यांनी केली" यामुळेही मराठा आंदोलनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असं शरद पवारांनी म्हटलं आहे.


शांतता राखण्याचं आवाहन


आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळावे. सर्वसामान्य जनतेला आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि आतापर्यंत या आंदोलनाला जनतेची असलेली सहानुभूती टिकवून ठेवावी असं आवाहनही पवारांनी केलं आहे.