मुंबई : ‘छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’ची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडेंची ही घोषणा महत्त्वाची आहे.
‘छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 50 टक्के फी घेणं अपेक्षित आहे. पण काही विद्यालयांकडून पूर्ण फी घेतली जात आहे. मराठा समाजातील 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर आहे,’ असंही तावडे म्हणाले.
महाविद्यालयांकडून अशी फसवणूक होत असल्यास त्यांच्याविरोधात तक्रार करावी. यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती तावडेंनी दिली.
दरम्यान, उद्या मराठा मोर्चाकडून मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, असं विनोद तावडेंनी सांगितलं.
मराठा आंदोलनावर भाष्य
‘गेल्या अनेक वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या आघाडी सरकारने मराठा समाजासाठी केवळ घोषणा केल्या. तत्कालीन सरकारमधील नेत्यांनी केवळ आपल्या घराणेशाहीला फायदा होईल, याकडे लक्ष दिलं,’ असं म्हणत तावडेंनी आधीच्या आघाडी सरकारवर टीका केली.
‘महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. पण न्यायालयामध्ये या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह योजना घोषित केलेल्या आहेत, असंही विनोद तावडे म्हणाले.