मुख्यमंत्री डिनरसाठी ‘मातोश्री’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2016 05:49 PM (IST)
मुंबई : विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिनरसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मातोश्रीच्या डिनर टेबलवर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा रंगणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधलं शीतयुद्ध सगळ्यांनाच माहिती आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी परस्परविरोधी वक्तव्य करून राजकीय वातावरण चांगलंच गरम केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जेवणासाठी मातोश्रीवर गेल्यामुळं सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.