''वाढदिवसाच्या होर्डिंग्जवर खर्च करण्याऐवजी 'जलयुक्त शिवार'मध्ये योगदान द्या''
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 04:48 PM (IST)
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व हितचिंतकांनी जाहिराती-होर्डिंग्जऐवजी 'जलयुक्त शिवार' अभियानासाठी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारताच राज्यातील 24 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी 'जलयुक्त शिवार' ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने तिचे सकारात्मक परिणाम अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गतवर्षीही आपला वाढदिवस साजरा न करता 'जलयुक्त शिवार' योजनेसाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला संपूर्ण राज्यभरातून अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला होता. या योजनेसाठी सहाय्य करणाऱ्यांचा ओघ त्यानंतरही सुरूच राहिला. या निधीतून अनेक गावांमध्ये 'जलयुक्त शिवार' अभियानाची कामे सुरू असून ती दुष्काळमुक्तीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आपल्या वाढदिवसापेक्षा राज्यातील दुष्काळमुक्तीच्या या पवित्र अभियानात प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावर्षी देखील केले आहे.