मुंबई : ठाकरे बंधूंच्या संपत्तीच्या वाद हायकोर्टात गेल्यापासून जयदेव आणि उद्धव यांच्यातले मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. हायकोर्टात सुरु असलेल्या उलटतपासणीत जयदेव यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडत, राजकीय वारशाबाबतही धक्कादायक माहिती दिली.
ठाकरे बंधूमधला संपत्तीचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. हायकोर्टात उलटतपासणी दरम्यान सुरु असलेल्या गौप्यस्फोटाची मालिका जयदेव ठाकरेंनी सुरुच ठेवली.
"राजकीय वारसा मी पुढे न्यावा, ही बाळासाहेबांची इच्छा होती"
"बिंदुमाधव मातोश्रीतून बाहेर पडल्यावर मी राजकीय वारसा पुढे न्यावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. 1995 मध्ये बाळासाहेबांनी तू माझा राजकीय वारसा चालवं, असं म्हटलं होतं. बिंदुमाधव राजकारणात येण्यासाठी कधीच उत्सुक नव्हता.", अशी माहिती जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात उलटतपासणीवेळी दिली.
सध्या शिवसेनेची कमान उद्धव ठाकरेंकडे आहे. शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंकडे गेल्याचं जयदेव ठाकरेंना रुचलेलं दिसत नाही.
"1994 मध्ये माझी पत्नी स्मिताला राजकारणात फार रस होता. त्याचवेळी आम्ही दादरला शिफ्ट झालो. माँसाहेब गेल्यावर स्मिताचं मातोश्रीवर जाणं-येणं वाढलं. त्यातच तिचा राजकारणाकडे कल वाढू लागला आणि तिचं घराकडे लक्ष कमी होतं गेलं. ही बाब मी बाळासाहेबांना सांगितली. त्यांनाही ते आवडलं नाही. त्यानंतर मी कलिनातल्या फ्लॅटवर शिफ्ट झालो. मात्र आमच्या दोघात वाद होऊ नये, म्हणून त्यांनी मला कायम कलिनामध्ये राहू नको असं सांगितलं. आताच बायपास सर्जरी झाल्यानं तू दिवसा मातोश्रीवर राहा आणि रात्री हवं तर कलिनाला जा, असा बाळासाहेबांनी मला सल्ला दिला.", असे जयदेव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब गेल्यापासूनच मातोश्री बंगल्यावर जयदेव ठाकरेंनी दावा केला आहे. हायकोर्टातही उलटतपासणीत जयदेव यांनी मातोश्रीचा उल्लेख केला.
"मातोश्रीच्या पुनर्विकासासाठी मी सुद्धा पैसे दिले. रोख पैसे दिल्यानं माझ्याकडे त्याची पावती नाही. त्यामुळं माझ्या वकिलांनाही मी याची माहिती दिलेली नाही", असेही जयदेव ठाकरे म्हणाले.
उलटतपासणीच्या शेवटच्या टप्प्यात जयदेव यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला. उद्धवनं मला दगा दिल्याचं जयदेव यांनी कोर्टात म्हटलं.
उद्धवनं रेशनकार्डावरुन नाव काढल्यानं नाराजी
"2003 नंतर बाळासाहेबांवर आणि घरावर उद्धवचं वर्चस्व वाढत गेलं. उद्धवनं षड्यंत्र रचून माझं नाव रेशनकार्डमधून काढलं. 2005 मध्ये साहेबांनी पाठवल्याचं सांगून एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि मला सही मागितली. माझ्यासाठी एकच साहेब आहेत, बाळासाहेब. उद्धवला मी कधीच साहेब मानलं नाही. बाळासाहेबांनी त्या व्यक्तीला पाठवलं असं समजून मी सही केली. संध्याकाळी मी बाळासाहेबांना फोन करुन विचारणा केली. तेव्हा हा चावटपणा कुणी केला मी पाहतो आणि परत तुझं नाव टाकण्याचा प्रयत्न करतो असं बाळासाहेबांनी सांगितलं", असे जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात सांगितलं.
ठाकरे बंधूंमधल्या संपत्तीच्या वादावरुन जयदेव ठाकरेंकडून जुनी प्रकरणं उकरायला सुरुवात झाली आहे आणि घरातला वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळं गौप्यस्फोटाची मालिका उलटतपासणीच्या माध्यमातून यापुढंही महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहे.