Eknath Shinde : नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही 'धर्मवीर' घरात घरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही.असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यरात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनासाठी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने गुरुवारी आले होते, पण रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला नव्हता. अखेर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहचले आणि रात्री पाऊण वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून समर्थकांचे कौतुक केले. 


आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय - मुख्यमंत्री
गुरुवारी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्म मुंबईत आल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री व शिंदे समर्थक आमदार गेले होते. तिथे त्यांना उशीर झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मध्यरात्री उशीरा कार्यक्रमात पोहचलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केलीय. मध्यरात्री असा मेळावा कोण घेऊ शकत नाही. आज जो कार्यक्रम झाला, राज्यात रात्री दोन वाजता एकही सभा झाली का? या कार्यक्रमाला ते संभाजीनगरहून मुंबईत आले, हे लोकांचे प्रेम आहे. रात्री उशिरापर्यंतच्या कार्यक्रमातही लोक थकले नाहीत. समर्थन करणाऱ्या सर्वांचा मी आदर करतो.जे काही चाललं होतं त्यात संजय शिरसाट पुढे होते, असं सांगत त्यांनी शिरसाट यांचं कौतुक केलंय. मी शिरसाट यांना विचारतो की तुम्ही मुंबईत असतात मग मतदारसंघात काय करायचं? पण ते बोलले होते, मतदारसंघ ओके आहे, आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय. असं शिंदे म्हणाले. 


"नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला"


मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सहा महिन्यात एक चित्र दिसत गेलं, जे सगळीकडे आम्हाला घातक दिसू लागलं. आम्ही खूप प्रयत्न केलं होते पण काहीच झालं नाही. आम्हाला लक्षात आलं की राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करत होते. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, यात आमदारांचा स्वार्थ नाही, पण जनतेची कामं लक्षात घ्यावी लागतात. आज कार्यकर्त्यांना काय मिळालं? कामं मिळाली? गुन्हे दाखल झाले. न्याय मिळाला नाही. बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही धर्मवीर घरात घरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही. ज्यांना आवडला नाही तर नाही आवडला आम्ही पुढे जाणार, शिवसैनिकांना आज काय मिळालं? खोट्या केसेसमध्ये जावं लागलं, आम्ही इच्छा असूनही वाचवू शकलो नाही. अशा वेळी आम्ही काय निर्णय घ्यायचा, काय झाले ते बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार? बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आमचा शत्रू आहे. औरंगाबादचे नाव संभाजी नगर कधी झाले, जेव्हा आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा मांडला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले तर आम्ही दोषी ठरलो? असे शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिव्यांग कार्यकर्त्यांचा सन्मान
संभाजीनगरहून मुंबईला आलेल्या विनोद यादव या कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेजवर बोलवून सन्मान केला, तसेच त्याला स्टेजवर बसण्याची संधी दिली हे चित्र पाहताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. संजय शिरसाट यांनी भाषण सुरु असताना त्यांनी सांगितले, की हा कार्यकर्ता थेट संभाजीनगरहून आला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात करण्याआधी या दिव्यांग कार्यकर्त्याला स्टेजवर बोलवून त्याचा सन्मान केला.