मुंबई : भारताचा आज 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralaya) ध्वजारोहण सोहळा पार पडला. यानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सोबतच यावेळी त्यानी सरकारने जनतेसाठी केलेल्या योजनांची उजळणी केली. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना, एसटीने तिकीटात महिलांना सूट, राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि तपासणीचा निर्णय यासह अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली. 


महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह


संपूर्ण देश स्वातंत्र्यदिनाच्या रंगात रंगला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला आहे. सरकारी इमारती, मंदिरं, धरणं यासह विविध वास्तूंवर तिरंग्याची आकर्षक रोषणाई करुन स्वातंत्र्यादिन साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आधी वर्षा या शासकीय निवासस्थानी मग मंत्रालयात ध्वजारोहण केलं.  


'फडणवीस आणि पवारांची चांगली साथ'


मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आनंद होत आहे. गरजूंच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. पंतप्रधान यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम घेऊन आपल्याला जबाबदारीच आठवण करुन दिली. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही विकासाची गंगा वाहावी यासाठी काम करता आलं. केंद्र आणि राज्याचा समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळते." 


पीक विमा, तिकीटात सूट, मोफत उपचार... मुख्यमंत्र्यांकडून योजनांची उजळणी


राज्यातील जनतेसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती देताने एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना चालू केली. साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजासाठी केलेली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना सूट दिली. राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि मोफत तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.


यासोबतच उद्योजक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला पसंती देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक नंबर वर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, असंही त्यांनी म्हटलं.


प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटी निधी खर्च करणार : देवेंद्र फडणवीस


दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजारोहण केलं. यावेळी भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "चंद्र, सूर्य असेपर्यंत हा तिरंगा फडकत राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हर घर तिरंगा मोहिमेत गरिबातील गरिबांनी यात सहभाग घेतला. मेरी माटी मेरा अभिमानमध्ये सहभाग घेत आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने मदत करत आहे. मग पीक विमा असो, कर्ज माफी योजना, कर्ज पुनर्गठन योजना अशा वेगवेगळ्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांना करत आहे."


"शेतकऱ्यांसाठी अॅग्री बिझनेस व्यवस्था उभारत आहे. प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी सहा हजार कोटी निधी खर्च करणार आहे. घरकुल योजनेतून समाजातील सर्व घटकांना नवीन घर देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सरकारी रुग्णालय आधुनिक व्हावे यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा स्टील उद्योग येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक लाख कोटी गुंतवणूक करण्यापर्यंत उद्योजक इच्छुक आहे.  देशात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अतिशय सक्षम आहे," असं फडणवीस म्हणाले.