प्रेझेंटेशन द्या, 5 प्रभावी निर्णय सांगा, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 07:58 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. सोमवारी एकूण सहा मंत्र्यांचा गेल्या चार वर्षातील कामगिरीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढाव्याच्या पहिल्या दिवशी, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या चार वर्षातील कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. या आढावा बैठकीवेळी संबंधित खात्यांचे राज्यमंत्रीही उपस्थित होते. प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपल्या कारकीर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्वाचे पाच निर्णय घेतले, याचे प्रेझेंटेशन करण्यास सांगितले होते. महत्त्वाचं म्हणजे या आढावा बैठकीसाठी मंत्री आणि संबंधित राज्यमंत्र्यांना वेगवेगळे बोलाविण्यात आले होते. उर्वरित मंत्र्यांच्या कामाचा आढावा येत्या 28 तारखेपर्यंत घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांना परफॉर्मन्स रेटिंग देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात होऊ घातलेल्या फेरबदलामध्ये या सर्व बाबींची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणार असल्याचं समजते.