मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. दरम्यान विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार घातला आहे. चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं व्यासपीठ असतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकप मांडला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार आहे. सरकारकडून राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे. तर उर्वरित 40 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
तसेच, राज्यातील 2019 गावांना आणि 4592 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 32 हजार हेक्टरमध्ये चारा लागवड करण्यात येणार आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळ पक्षांचा नाही तर राज्याचा प्रश्न आहे, त्यामुळे विरोधी पक्षाच्या सूचनांवर सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी
जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकारने राज्यातील शहीदांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत दिली आहे. तसेच इतर लोकही शहीदांना मदत करु शकतात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
व्हिडीओ - UNCUT | अधिवेशनाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद