मुंबई: रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यानं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी केली.

 

'आठवले आहेत बाबासाहेबांचा ढाण्या वाघ'

 

मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी बोलताना रामदास आठवलेंच्या शैलीतच त्यांचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कविताही केली. 'आठवले आहेत बाबासाहेबांचा ढाण्या वाघ, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्यांच्या वाटेला गेले त्यांची झाली राख!' अशी कविता करत मुख्यमंत्र्यांनी आठवलेंचं कौतुक केलं.

 

मुख्यमंत्र्यांचे पवारांना खडे बोल

 

दरम्यान, याचवेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चावरुन पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. अशा मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.

 

मराठा समाजानं शांततेत काढलेल्या मोर्च्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाजाचे आभार मानले. पण अशा घटनांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे होता.