मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला 4 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन एबीपी माझाकडून करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सिंचन घोटाळा, कर्जमाफी, आरक्षण, शिवस्मारक, दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार, भाजप -शिवसेना युती आदी मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.


सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंचन घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांचे हात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निकालाला उशीर लागत आहे. तसेच यात अनेक राजकीय नेत्यांचेही संबंध आहेत, मात्र ते भ्रष्टाचारी आहेत किंवा त्यांची अकार्यक्षमता या भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरली हे दोनच मुद्दे आहेत.


सिंचन घोटाळ्यात हात असलेले कुणीही सुटणार नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.


भाजप सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात सिंचन क्षेत्रात झालेल्या कामाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात दिला. मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत राज्यातील 1 लाख 38 हजार शेततळी तयार झाली आणि 30 हजार शेततळी तयार होत आहेत. तसेच दीड लाख सिंचन विहिरी तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


 सिंचन क्षेत्रात सरकारने केलेल्या कामांमुळे येत्या काळात 50 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. राज्यात पाऊस कमी असूनही शेतीतील उत्पादन वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.


आघाडी सरकारच्या काळाततील कर्जमाफीमध्ये घोटाळा


शेतकरी कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ऑनलाईन पद्धतीने राबविल्याने आमच्यावर टीका झाली. मात्र 47 लाख अकाऊटं आम्ही या प्रक्रियेद्वारे सेटल केली. ऑनलाईन पद्धतीने कामात पारदर्शकता आणण्याचा आम्ही प्रयत्न केला.


जुन्या पद्धतीने कर्जमाफी केली असती चुकीच्या पद्धतीने हे कर्जवाटप झालं असतं. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीची यादीही सध्या उपलब्ध नाही. मागील सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.