मुंबई: राज्याचा कारभार सुसाट चालवण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता जरा दमानं घ्या म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मागच्या सहा महिन्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर 13 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दंडाची वसुली अध्याप झालीच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
वाहतुकीचे नियम मोडून दंड थकवणाऱ्यांच्या यादीत राज ठाकरे, अजित पवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांचीही नावं आहेत. या यादीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव असल्याचं आता समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा निघतो तेव्हा अन्य वाहतूक अडवली जाते. सिग्नल हिरवे होतात. त्यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असतो. पण असं असताना मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना वाहतुकीचे नियम तोडण्याची वेळ का बरी यावी? हा प्रश्न पडण्याचं कारण की मुख्यमंत्र्यांच्या वाहनाने गेल्या सहा महिन्यात अनेकदा वेगमर्यादा ओलांडल्याचा दावा, आरटीआय कार्यर्त्याने केला आहे.
वाहतूक पोलिसांच्या MTP app च्या मार्फत ही माहिती समोर आणल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांचा दावा आहे.
ई-चलन प्रणाली सुरु झाल्यापासून वाहतूक नियम मोडणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. वाहतूक पोलिसांसोबत होणारे वाद कमी झाले आणि सीसीटीव्हीच्या नजरेमुळे वाहन चालकांवर जरब बसली. पण कोट्यवधींचे दंड विशेष करुन VIP मंडळींकडून वसूलच होत नसल्याने याची अंमलबजावणी यशस्वी होणार नाही अशी भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दररोज तासनतास ट्रॅफिक जाम आणि लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कायम रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळत असलेल्या मंत्री – सेलिब्रिटींनी नियम मोडूनही, त्यांच्याकडून दंड वसूल होत नाही.
आता तुम्ही म्हणाल राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी कसले आलेत वाहतुकीचे नियम. त्यांच्या कामाचा आवाका, ताण आणि व्याप पाहता त्याची सर्वसामान्यांच्या कामाशी तुलनाच होऊ शकत नाही. पण कामावर वेळेत पोहचायचे असेल किंवा एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुमची-आमची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होईल का.? नाही ना..? आणि का व्हावी..? कारण इथे प्रश्न फक्त कायद्याचा नाही तर जीवाला असलेल्या धोक्याचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फक्त 13 हजारांची थकबाकी भरली तर लोकांसमोर एक नवीन पायंडा रचला जाईल.
ऋत्विक भालेकर,एबीपी माझा,मुंबई
संबंधित बातम्या
वाहतुकीचे नियम मोडून दंड थकवला, राज, अजित पवार, दिवाकर रावते, सलमानची नावं
कारभारी दमानं... वाहतूक नियम मोडून मुख्यमंत्री सुसाट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2018 04:02 PM (IST)
वाहतुकीचे नियम मोडून दंड थकवणाऱ्यांच्या यादीत राज ठाकरे, अजित पवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता सलमान खान यांचीही नावं आहेत. या यादीत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव असल्याचं आता समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -