मुंबई : पत्नीला वाढदिवसाचं सरप्राईज देण्यासाठी परदेशातून आलेल्या तरुणाचा मुंबईत अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मूळ पुण्याच्या असलेल्या 32 वर्षीय आयटी प्रोफेशनलचा मुंबईत सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला.

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी बेल्जियमला राहणारा तेजस दुबे मायदेशी आला. आयटी इंडस्ट्रीत कार्यरत असलेली तेजसची पत्नी पुण्यात राहते. शनिवारी तिचा वाढदिवस असल्यामुळे तेजस शुक्रवारी मुंबईत पोहचला. दुसऱ्या दिवशी कारने पुण्याला जाण्याचा त्याचा प्लान होता.

शुक्रवारी रात्री तो मुंबईतील मित्र रोहित सिन्हाकडे थांबला. तेजस आणि रोहित इंजिनिअरिंगपासून मित्र होते. सांताक्रुझला सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रोहित भाड्याने राहतो.

तेजस-रोहितचा आणखी एक मित्र तिथे आला. पहाटे तीन वाजेपर्यंत तिघं गप्पा मारत बसले होते. तिसरा मित्र पहाटे ओशिवऱ्यातील घरी निघून गेला, तर तेजस आणि रोहित बेडरुममध्ये झोपायला गेले.

पहाटे पाच वाजताच्या सुमारास तेजसला जाग आली. त्याचा बेड फ्रेंच विंडोच्या बाजूलाच होता. दुर्दैवाने खिडकी उघडी होती आणि तिला बाहेरुन ग्रीलही नव्हतं. अंधारात चालताना तेजसचा तोल गेला आणि तो थेट सहाव्या मजल्यावरुन खाली पडला.

वॉचमनने या गोष्टीची माहिती त्याचा मित्र रोहितला दिली. तेजसला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. झोपण्यापूर्वी तिघांनी मद्यपान केलं होतं का, याविषयी पोलिस माहिती घेत आहेत.