मी पुन्हा येईन.! विधानसभेतील निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2019 10:50 PM (IST)
जे प्रश्न 15-16 वर्ष सुटले नव्हते ते पाच वर्षाच्या कालावधीत सोडवू शकलो, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निरोपाच्या भाषणातही विरोधकांना टोलाही लगावला.
मुंबई : भाजपा-शिवसेना सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरोपाचं भाषण करताना आपण पुन्हा सत्तेत येऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक कविताही सादर केली. मुख्यमंत्री म्हणाले, "शेवटी सांगतो - मी पुन्हा येईन, याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी, नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी, मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मी पुन्हा येईन, बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नवयुवकांनी न्याय देण्यासाठी मी पुन्हा येईन, याच ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीची साथ घेई,न त्याचा हात हातात घेईन...!!! विधानसभेतील या सरकारच्या कारकीर्दीतील शेवटच्या अधिवेशनातील शेवटच्या भाषणात मुख्यमंत्री पाच वर्षात केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. माझ्यावर जी जबाबदारी दिली, त्याला न्याय देण्याचा प्रयत्नन केला. सगळ्यांना सोबत कसं ठेवता येईल हा प्रयत्न केला. मी सकारात्मकता कधी सोडली नाही. अनेक प्रश्न, अडचणी समोर आल्या. पण त्यातून पळालो नाही, सकारात्मकतेने तोंड दिलं आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे प्रश्न 15-16 वर्ष सुटले नव्हते ते पाच वर्षाच्या कालावधीत सोडवू शकलो, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निरोपाच्या भाषणातही विरोधकांना टोलाही लगावला. पक्षाने माझ्याकडे दिलेली ही जबाबदारी सोपी नव्हती, याची कल्पना होती. जे जे समोर आलं त्याला सामोरं जात गेलो, असंही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी हे सरकार आणि सदन तयार झालं आहे, ते आपलं दैवत आहे, त्याची सेवा करायची या एकाच उद्देशानं मी काम करत होतो, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले. प्रामाणिकता आणि सकारात्मकता असली तर कुठल्याही गोष्टीचा सामना आपल्याला करता येतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपतींचा आदर्श, बाबासाहेबांनी संविधानाने दाखवलेला मार्ग, फुले, शाहू आंबेडकर या विचाराने दाखवलेली दृष्टी, दीनदयाल यांचा अंत्योदयाचा विचार, अटलजींचा सन्मार्ग, मोदींचा राजकारभार कसा चालवायचा तो वस्तुपाठ मनामध्ये ठेवून गेले पाच वर्ष काम केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेती, उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामं केली, गुंतवणूक आणल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला. समस्या संपल्या हा माझा दावा नाही, अजून लांब पल्ला आपल्याला गाठायला आहे. जे काही राज्याचं वैभव कमी होत होतं, ते वैभव परत आणण्याकरता आपण यशस्वी ठरलो, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्र सर्व आघाड्यावर क्रमांक एकचं राज्य आहे. जलयुक्त शिवारसारखी योजना, ज्या योजनेला लाखो लोकांनी हातभार लावला, मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहे, याचे यश सरकारचे नाही, ते जनतेचं आहे. काही नवीन गोष्टी करायला मिळाल्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा नवीन प्रकारे वापर आपण याठिकाणी केला. 550 कोटी रुपयांचे वाटप आपण गरीब रुग्णांना करू शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. विदर्भाच्या बॅकलॉगचे मुद्दे असतील, त्यात वीजेच्या कनेक्शनचा बॅकलॉग पूर्ण करू शकतो, सिंचनाच्या योजनांना चालना दिली या गोष्टींचा मला आनंद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईपासून अवघ्या 10 किलोमीटवरील एलिफन्टा बेटावर 70 वर्षानंतर पहिल्यांदा वीज पोहचवण्याचं काम या सरकारने केल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. गडचिरोलीपासून 150 किलोमीटर अंतरावर शेवटच्या गावात 70 वर्षात वीज पोहचवली. हरिसालमध्ये डिजिटल व्हिलेज तयार करून एक क्रांती करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न अनेक आहेत आरक्षणाचे आहेत, काही सुटले काही सुटायचे आहेत. सोबत गेलो तर हे प्रश्न निश्चितच सुटतील, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. अनेक वेळा विरोधी पक्षांनी सहकार्याची भूमिकाही घेतली. विधेयकं संमत करत असताना विरोधी पक्षांनी बरंच सहकार्य केलं, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आभार मानत ‘मी पुन्हा येईन’ या कवितेने निरोपाच्या भाषणाची सांगता केली.