मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवरुन परतताच आज (17 मार्च) कॅबिनेट बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी साडे दहा वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे.
उद्या (18 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सदनात सादर करण्यात येणार आहे. बजेट सदनात सादर करण्याआधी कॅबिनेटमध्ये मंजूर करुन घ्यावं लागतं. त्यामुळे या बैठकीत बजेट मंजूर करण्यात येईल. त्यानंतर उद्या सदनात अर्थमंत्री मुनगंटीवार हे बजेट सादर करतील.
दरम्यान, उद्या नेमकी काय भूमिका घ्यायची यावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे उद्या सरकराला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. जर सरकारला सदनात उद्या अर्थसंकल्प सादर करता आला नाही तर, त्यांच्यावर मोठी नामुश्की ओढावू शकते. या सर्व बाबींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या कॅबिनेट बैठकीला शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीचा रिपोर्टही शिवसेनेच्या मंत्र्यांना ‘मातोश्री’वर द्यावा लागणार आहे. त्यानंतर शिवसेना देखील आपली पुढची रणनिती ठरवेल.
आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचं शिष्टमंडळानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिल्लीला जाऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. अवघ्या 20 मिनिटातच ही बैठक आटोपली. पण या बैठकीत कर्जमाफीबाबत कोणतंही ठोस आश्वासन त्यांना देण्यात आलं नाही.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून ठोस आश्वासन नाही