नो हेल्मेट नो पेट्रोलबाबत चर्चेने तोडगा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 11:53 AM (IST)
मुंबई : 'नो हेल्मेट नो पेट्रोल'वरुन राज्यभर गोंधळ सुरु असताना आता विधानसभेतही या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी घेतलेल्या निर्णयाला खीळ बसण्याची शक्यता आहे. रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे. त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्त्व न पटणाऱ्या वाहनचालकांमध्येही याबाबत मोठा संताप आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हेल्मेटसक्ती गरजेची असल्याचं सांगतानाच त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत म्हटलं. त्यामुळे तूर्तास तरी रावतेंचा 'नो हेल्मेट नो पेट्रोल' हा निर्णय बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.