'उंदराने पोखरण्याची आम्हाला भीती नाही कारण आम्ही वाघ आणि सिंह एकत्र आहोत. वाटेत उंदीर येतील पण आम्ही त्यांचा निःपात करु आणि 2019 ला ही आम्ही एकत्रित येऊ' असे स्पष्ट संकेतच देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
'विरोधी पक्षनेते तुम्ही उत्तम उंदीर पुराण सांगितलं. तुमचं उंदीरपुराण रंजक आणि कल्पक आहे. तुम्ही उत्तम पटकथाकार आहात, यात शंका नाही' असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.
उंदीर घोटाळ्यावरुन विखे पाटलांची चौफेर टोलेबाजी
गेल्या आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तोच धागा धरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणात धमाल उडवून दिली. उंदिरांचे वेगवेगळे प्रकार सरकारी यंत्रणेवर कसे हावी झालेत याचं मार्मिक कथन त्यांनी केलं.
शिवसेनेला टोला
सर्व उंदरांना मारण्यासाठी राज्यात काही मांजरीही सोडल्या आहेत. या मांजरी 'विशेष' आहेत. कारण पूर्वी उंदीर असलेल्यांचे काहींचे रुपांतर आता मांजरीत झाले आहे. या मांजरी अनोख्या आहेत. त्यांनी वाघाचं केवळ कातडे पांघरले आहे. या मांजरींची दोस्ती फक्त 'पेंग्विन'शी आहे.
हे उंदीर 'नाईट लाईफ' वर फिदा असल्याने फक्त रात्रीच हैदोस घालतात. रुफ टॉप, कमला मिल, मिठी नदीचा मलिदा खाऊन या उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर झाले आहे. ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!
ही वाघाची मावशी उंदरांना भीती वाटावी म्हणून अधूनमधून 'म्याँव म्याँव' करीत फुत्कारत येते आणि सोडून जाण्याच्या धमक्या देते. पण दुधाची वाटी दाखवली की, पुन्हा गप्प होते आणि बिळात जाऊन बसते. आता हे मांजरीचे बीळ कुठे आहे, त्याचा पत्ता मी सांगण्याची गरज नाही. ते आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.
मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे तासभर वाट पाहून परतले
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट न घेताच परतले. नियोजित बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून उशीर झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना तासभर प्रतीक्षा करुन परतावं लागलं. भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी हात पुढे करण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवल्याने विधीमंडळात विरोधकांमध्ये कुजबूज सुरु आहे.
भाजपकडून युतीसाठी हालचाली, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी : सूत्र
शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा हालचालींना सुरुवात झाली आहे. युतीसाठी चर्चेची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दिली गेल्याचं सूत्रांकडून समजतं आहे.
तेलगू देसम पार्टीनं एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपनं राज्यात सावध पवित्रा घेतला आहे. तर कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानच्या निकालापर्यंत शिवसेना 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याची माहिती मिळतेय.
खरं तर शिवसेनेनं यापूर्वीच स्वबळावर निडवणूक लढण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता भाजपनं मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे युती होते की, पुन्हा शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. ‘केंद्रातली एनडीएची आघाडी राज्यात टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षाला सोडून निवडणुका लढवण्याची आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही.’ असं ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार : मुनगंटीवार
शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपचं एक पाऊल पुढे?