मुंबई : राज्यात सुरु झालेल्या सीएम चषकने 42 लाख तरुणांना मैदानात आणलं, आता हा महोत्सव झाला आहे. सीएम चषक ही सुरुवात आहे आता तुमच्या दांड्या उडवू अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली.


देशातील 2014 पूर्वीचे सरकार मुके होते. आता नरेद्र मोदींना भारताला स्वाभिमानी बनवलं आहे. आता चोरांना चोरी करता येत नाही, त्यामुळे सगळे चोर एकत्र आले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली.


"सीएम चषक तर झालं आता पुढे काय करणार, असा सवाल आम्हाला विचारण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सीएस चषक तो सिर्फ झाली है, पुरा सिनेमा अभी बाकी है", अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची फिरकी घेतली.



विरोधकांच्या दांड्या उडवू : मुख्यमंत्री


"सीएम चषकात आम्ही व्हॉलिबॉल खेळलो, आता निवडणुकीच्या मैदानात तुम्हाला स्मॅश मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सीएम चषकात क्रिकेट खेळलो, आता तुम्हाला असे यॉर्कर टाकू की तुमच्या दांड्या उडल्याशिवाय राहणार नाहीत", असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.


"आम्ही सीएम चषकाता कबड्डीही खेळलो, आता आगामी निवडणुकीत आम्ही अशी मुसंडी मारु की 400 चा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


जनावरं वाघाचा पराभ करु शकत नाहीत : मुख्यमंत्री


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात महाआघाडीची जोरदार चर्चा आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यानी वक्तव्य केलं. "देशात महाआघाडी होत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा किती जनावरांनी एकत्र येऊन कळप केला तरी ते वाघाचा पराभव करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाघ आहेत, कितीही जनावरं एकत्र आली तरी त्यांना कुणी पराभूत करु शकत नाही", अशा शब्दाता महाआघाडीवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला.


सीएम चषक क्रीडा आणि कला स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजयुमोच्या अध्यक्षा पुनम महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.