मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहे. लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. आज 22 मार्चपासून 31 मार्चपर्यंत लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.


कोरोनाचे देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.


Coronavirus | दुष्यंत सिंह इफेक्ट : संसदेचे अधिवेशन वेळेआधीच गुंडाळलं जाणार?


उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद
आज सकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत लोकल प्रवासावर निर्बंध लागू केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या पथकात GRP (रेल्वे पोलीस) - 1, राज्य पोलीस - 1 महसूल विभागाचा प्रतिनिधी - 1 आणि एक वैद्यकीय कर्मचारी असणार आहे. दरम्यान, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, अशांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. तर, लांब पल्ल्याच्या गाड्या चालूच राहणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना एक्सप्रेसने जायचं आहे, त्यांनाही रेल्वे स्थानकावर तिकीट दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.


Coronavirus | होम कॉरंटाईनच्या सूचना देऊनही स्थलांतर कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाई होणार


राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 64
कोरोनाचे राज्यात आज नवीन 12 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.


Coronavirus | उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद : कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड