Continues below advertisement


अमरावती : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार चक्क सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) घडल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली असून देशभरातली वकील संघटना व न्यायालयीन वर्तुळातून निषेध व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कालच त्यांचे बंधू आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (गवई) नेते डॉ. राजेंद्र गवई यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली होती. आता, सरन्यायाधीश भूषण गवई (bhushan gavai) यांच्यावरील हल्लाप्रकरणी त्यांच्या आई कमलताई गवई आणि बहीण कीर्ती अर्जुन गवई यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केला.


घटनात्मक मूल्यांवरील हल्ल्याच्या गंभीर विषयावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि नेत्या कमलताई गवई आणि बहीण कीर्ती अर्जुन गवई यांनी आपली तीव्र भूमिका मांडली.​ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना 'आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या' या तत्त्वावर आधारित आहे. कायदा हातात घेऊन अराजकता वाढवण्याचा कोणालाही अधिकार नाही. सर्वांनी आपले प्रश्न शांततेने आणि संवैधानिक मार्गाने सोडवावे, असे कमलाताई गवई यांनी म्हटले. तर, ​कालची घटना देशाला काळीमा लावणारी आणि निंदनीय आहे. हा केवळ व्यक्तिगत हल्ला नसून, ही एक विषारी विचारधारा आहे, जी थांबवलीच पाहिजे. असंवैधानिक वागणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आपण निषेध केलाच पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही धक्का लागू नये, यासाठी शांततेने आणि कॉन्स्टिट्यूशन लेवलवरच निषेध व्हावा, असे मत भूषण गवई यांची बहीण कीर्ती गवई यांनी व्यक्त केले.


भाऊ राजेंद्र गवई यांच्याकडून आवाहन (Rajendra gavai)


"भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला भ्याड आहे. मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या व्यक्तीद्वारे करण्यात आलेला हा हल्ला आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या सर्व अनुयायांना मी आवाहन करतो की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी.", अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी दिली होती.


राष्ट्रवादीकडून राज्यभर निषेध (NCP protest against cji attack)


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चक्क न्यायालयातच बूट भिरकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचे देशभरात सर्वत्र पडसाद उमटत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर निषेध नोंदविला. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्र येत माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध नोंदविला.


हेही वाचा


परमात्म्याने जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दु:ख नाही; सरन्यायाधीश बी.आर. गवईंना बूट दाखवणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य