मुंबई : एका कोरोनाबाधित वयोवृद्ध रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, राज्यातील इतर रुग्णांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माझाला दिली. तसेच, शाळांसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलंय. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 14 वर गेली असून कोरोनाचा देशातील पहिला बळी कर्नाटकात गेला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केलंय.


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली. यात बैठकीत काय करावे आणि काय करू नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. सध्या राज्यातील चौदापैकी फक्त एकाला श्वसनाचा त्रास होतोय. ज्यांचं वय 70 च्या वरती आहे. तर, अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं टोपे म्हणाले.

प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे
कोरोना व्हायरसचा गुणधर्म पाहता आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, आवश्यक आहे. सोबतच हा रोग पसरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सर्व राजकीय कार्यक्रमासह मोठे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. गरज पडल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. कोरोना आजाराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. सर्वांना या आजाराविषयी शिक्षित केलं जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Coronavirus | कोरोना व्हायरसचा भारतात पहिला बळी, कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

जनतेने घाबरुन जाण्याचं कारण नाही.
हा आजार सौम्य स्वरुपाचा आहे. यातील 10 ते 15 टक्के लोकांना हा आजार गंभीर स्वरुपाचा होतो. तर, दोन ते अडीच टक्के लोकांचा यात मृत्यू झालाय. त्यामुळे लोकांना अजिबात घाबरुन जाण्याची गरज नाही. फक्त काळजी घ्या, असं आवाहनही टोपे यांनी केलंय. सध्या राज्यात एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 14 जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. या कामात नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केलं. अनेक व्हायरल आजारांशी आपण लढलो आहे. फक्त अशा रुग्णांपासून लांब राहणे, स्वच्छता पाळणे आणि परदेशातून आलेल्या लोकांशी संपर्क टाळणे, हे प्रतिबंधाकात्मक उपाय करण्यास टोपे यांनी सांगितले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नये
कोरोना विषाणू हा हवेतून पसरत नाही. त्यामुळे कायम मास्क लावणे चुकीचं आहे. एन95 हे मास्क सर्वसामान्यांसाठी नाहीत, ते मास्क डॉक्टर आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी आहेत. सॅनिटाझरला सध्या खूप मागणी आहे. मात्र, हात धुण्यासाठी सॅनिटाझरचा आग्रह धरू नका. साबणाने हात स्वच्छ धुतले तरी चालतील, असंही टोपे म्हणाले. पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी घरुन कामाला परवानगी दिली आहे, ही गोष्ट स्वीकाहार्य आहे. सध्या परिस्थितीत हातात आहे. मात्र, पुढे मागे तसं काही वाटल्यास शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

coronavirus | आलाना हाऊसमध्ये नमाज पठण बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय