मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत असताना राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासून बंद असलेले राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहे. यासंबंधीची एसओपी लवकरच जारी केली जाणार आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाहीत.


राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थां सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहणार आहेत.


बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर उद्यापासून मुभा देण्यात येत आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीच्या एसओपीही लवकरच जारी करण्यात येणार आहे.


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती


राज्यात काल 4909 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर नवीन 6973 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. एकूण 15 लाख 31 हजार 277 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 16 हजार 543 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.46 टक्के  झाले आहे.


संबंधित बातम्या




Cinema Halls Reopen | राज्यात उद्यापासून 50 टक्के क्षमतेनं सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू