मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर भाजप गोस्वामी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेली दिसत आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून गावागावतून भाजपतर्फे या अटकेचा निषेध करत आहे. तर महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडूनही याला जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.


परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात..


आज अर्णव गोस्वामी यांना अटक झाली ही त्यांच्या विरोधात 2018 मध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती, त्यात अर्णव गोस्वामी यांचे नाव होते. त्यातील अजून दोन नावं होती. त्या नोटवरून तपास झाला नव्हता. त्यांच्या पत्नीने पुन्हा एकदा कोर्टात मागणी केल्यानंतर कोर्टाने तपास करण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यानुसार आज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या केसचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.


भाजप अर्णवला का वाचवण्याचा प्रयत्न करतंय?
भाजप नेते असे रडतात जणू काही हा त्यांचा कार्यकता आहे, हा अविर्भाव आणला जातो. याचा वृत्तपत्र स्वातंत्र्यशी काय संबंध? आणीबाणीचा संबंध येतो का? भाजप अर्णवला का वाचवण्याचा प्रयत्न करतंय हा प्रश्न आहे. एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, तिला विधवा केलं त्या बाईंच्या तक्रारींवर तपास केला, ती चौकशी बंद केली गेली. कोर्टाने तपासाचे आदेश दिले तर एका मराठी महिलेला विरोध करायचा काम भाजप का करते?


गोस्वामी भाजपचा सदस्य आहे का? : परब
गोस्वामी भाजपचा सदस्य आहे का? त्याच्यासाठी गळा काढण्याचे कारण काय? महाराष्ट्रात मराठी महिलेवर अन्याय झाला तर तिच्याकडे पाहायचं नाही, आम्ही ते दाबून टाकलं तुम्ही पण दाबून टाकावं अस म्हणणं आहे का? तिचं कुंकू पुसलं त्याचं समर्थन आहे, हे भाजपने स्पष्ट सांगावं. भाजप खुन्याला वाचवत दुहेरी भूमिका घेत आहे. सोनिया गांधी यांनी सुसाईड नोट लिहायला दिली होती का? सोनिया गांधी काही दररोज राज्यातील गोष्टी पाहत नाही. उद्धव ठाकरे सरकार चालवतात. अर्णव गोस्वामी मुळे भाजपला राजकीय त्रास का होतोय?


या केसमध्ये जे पोलीस यात दोषी असतील ह्याची चौकशी करून कारवाई करू. जर त्यावेळच्या पोलिसांनी दबावाखाली काम केलं असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकला, भाजपचा जीव त्याच्यात अडकला आहे का? फिरोज शेख, नितीश सारडा यांना अटक झाली. त्याविषयी भाजप का बोलत नाही? भाजपला खुनी माणसाला वाचवायचा आहे का? असे प्रश्न मंत्री परब यांनी विचारले आहेत.


आम्ही पोपट बीपट पाळत नाही : चंद्रकांत पाटील


ही ठोकशाही आहे, अर्णबची सुटका होईपर्यंत आम्ही काळे पट्टे, जे जे काळे परिधान करू शकू ते करणार आहे. उद्धव आणि सोनियाजींनी अशा भ्रमात राहू नये की काही होत नाही. आणीबाणीनंतर पराभव झेलावा लागला होता. अर्णब काही आमचा कार्यकर्ता नाही, आम्ही पोपट बीपट पाळत नाही, ते पाळण्याचे काम तुम्हीच करता. आम्ही खंबीर लोक आहोत, दुसऱ्याच्या जीवावर राजकारण करत नाही.


ती जमीन केंद्राची : पाटील
मिठागर हे केंद्राचे आहे, ज्याचा वापर होत नाही त्या जमिनी स्टेटला द्याव्या असा निर्णय, पण बाफना नावाच्या मलबार हिलच्या आमदाराचा मुलगा कोर्टात गेला आणि कोर्टाने हस्तांतरणाला स्टे दिला आहे. त्यामुळे मी जरी राज्याची आहे, असा निर्णय दिला असला तरी केंद्र आणि मिठागर आयुक्त कोर्टात गेलं आहे.


Arnab Goswami | अर्णब गोस्वामी अलिबाग कोर्टासमोर हजर; अलिबाग न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष