ठाणे :   किरण नाक्ती हे नाव तुम्ही आधी देखील ऐकले असेल मात्र ते एक दिग्दर्शक म्हणून. आता मात्र किरण यांची ओळख पूर्णतः बदलली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. गेल्या 8 महिन्यात ते घरीच गेले नाहीत. केवळ कोरोनाशी जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व त्यांनी वाहून घेतले. ज्यावेळी तब्बल 240 दिवसांनी किरण आपल्या घरी परतले, त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.


आपला व्यवसाय सोडून समाजासाठी स्वतःच्या घरापासून तब्बल 240 दिवस घराबाहेर राहून किरण नाक्ती सेवा देत होते.  दिवाळीत 241 व्या दिवशी त्यांची घरवापसी झाली आणि त्यांच्या आई आणि बायकोच्या आनंदाला पारावर उरला नाही.  “वुई आर फॉर यू” या संस्थेच्या माध्यमातून किरण नाक्ती यांनी ज्येष्ठ नागरिक, कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिवसरात्र सेवा दिली. तेही एका पैशाचा मोबदला न घेता.


किरण यांनी समाजकार्याला वाहून घेतले खरे पण त्यांच्या आईला सतत मनात काहूर माजलेले असायचे. बायका पोरांना सोडून एकुलता एक मुलगा कोरोनच्या भयंकर काळात असा दिवस रात्र फिरतो, लोकांना मदत करतो, याची भीती सतत त्यांच्या मनात असायची. पण किरण जेव्हा घरी परतले त्यावेळी लोकांचे मिळालेले आशीर्वाद पाहून त्यांचे आईचे मन भरून आले.  किरण हे फक्त घरी महिन्याचे सामान वगैरे पाहिजे असल्यास किंवा एखादी मदत हवी असल्यास यायचे ते देखील घराबाहेरून निघून जायचे.



अशी केली मदत
गेले 8 महिने ज्यांना स्वतःच्या सख्ख्या नातेवाईकांनी टाकून दिले अशा लोकांना किरण यांनी मदत केली आहे. कोरोनाग्रस्तांचा, त्यांच्या नातेवाईकांना किरण नाक्ती हे विविध प्रकारच्या 15 सेवा देतात. सुरुवातीला त्यांनी मास्क वाटप केले. यानंतर घरपोच किराणा देणे, आपत्कालीन परिस्थितीत मोफत रिक्षा सेवा, ज्येष्ठ नागरिकांना टिफिन सेवा, ज्येष्ठ नागरिकांना मोफत जेवणाचे डबे पोहोचविणे, घरपोच भाजीपाला, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास तो परिसर मोफत निर्जंतुकीकरण करून देणे, घरपोच औषध पोहोचविणे अशा 15 सेवा त्यांनी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना दिल्यात आणि अजूनही देत आहेत. एवढच नाही तर कोरोनाग्रस्तांचे आणि त्यांच्या परिवाराचे समुपदेशन सारखे महत्वाचे काम ही किरण नाक्ती करत होते.


आज किरण यांची ओळख एक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर अनेकांचा देवदूत म्हणून निर्माण झाली आहे. किरण यांनी "सिंड्रेला" चित्रपट जितक्या संवेदनशीलतेने आणि सामाजिक जाणिवेने बनवलाय तीच सामाजिक जाणिव आज ते अंमलात आणत आहेत. वुई आर फॉर यु आज हजारो लोकांपर्यंत पोचल्याने त्यांचा परिवार वाढतोय. तसेच त्यांनी मदत केलेल्या लोकांचे आशीर्वाद देखील त्यांच्या पाठीशी जमा होत आहेत.