नवी मुंबई : कोरोनाची स्थिती पाहता लोकांना दिलासा देण्यासाठी सिडकोने घर लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने 2018-19 मध्ये 25 हजार घरांची लॉटरी काढली होती. मात्र कोरोनामुळे बहुतांश लोकांना घर मिळूनही पैसे भरता आले नव्हते. पहिला हफ्ताही न भरल्याने अनेकांवर लॉटरीमध्ये लागलेले घर गमावण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली. परंतु लोकांना त्यांच्या स्वप्नातील घरात राहायला जाता यावं यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. घराचा एकही हफ्ता न भरलेल्या लोकांचं घर रद्द न करता, त्यांना 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्यांचे काही हफ्ते बाकी आहेत, त्यांनाही 31 जुलैपर्यंत वेळ मिळणार आहे. 16 महिन्यांची लागलेली लेट फी सुद्धा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात आर्थिक कंबरडं मोडलं असताना, सिडकोने रद्द केलेल्या लेट फीमुळे घर लाभार्थ्यांचे लाखो रुपये वाचणार आहेत. 


महाराष्ट्र शासनाच्या "सर्वांसाठी घरे" धोरणांतर्गत सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना 2018-19 अंतर्गत घरांची घोषणा करण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25 हजार घरं प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी जाहीर करण्यात आली होती. या योजनेची सोडत पार पडली. यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करुन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचं तर काही अर्जदारांचे हफ्ते थकित असल्याचं आढळून आलं. या अर्जदारांच्या विनंतीवरुन सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते. 


महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकतं. परंतु कोविड-19 ची महामारी आणि त्यानंतर लागू केलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसंच या योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणं, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकित असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याचं निर्णय घेतला. तसंच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकित हफ्त्यांवर लागू होणारी लेट फी माफ करणार असल्याचंही जाहीर केलं. या अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावा लागणार आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. 


यासाठी संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करुन आपल्या थकित हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा करायचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सिडकोतर्फे करण्यात आलं आहे.