मुंबई : नाताळनिमित्त (ख्रिसमस) मुंबई, नाशिक, वसई, गोव्य़ासह देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. विविध शहरातल्या बाजारपेठा नाताळनिमित्त फुलून गेल्या आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी आकाश कंदिल यासह विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सर्व चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशकातील कॅनडा कॉर्नर परिसरातील सेंट आंद्रिया चर्चला रोषणाई करण्यात आली असून चर्चबाहेर येशूंचा जिथे जन्म झाला त्या गाईच्या गोठ्याची प्रतिकृती साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.


मुंबईमधल्या वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चमध्ये रात्री 12 नंतर नाताळचा सण साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माऊंट मेरी चर्च विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. मुंबईतल्या या ख्रिसमस सिलिब्रेशनचा अनुभव घेण्यासाठी मुंबईबाहेरूनसुद्धा लोक येथे आले आहेत. माहीम चर्च, कुलाबा चर्च, डॉन बॉस्को चर्च या सर्व मुंबईतील जुन्या चर्चमध्ये परंपरागत ख्रिसमस सिलिब्रेशन केलं जात आहे.


मुंबईच्या वांद्रे रेक्लेमेशनवर नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रेक्लमेशनच्या दुतर्फा ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईकरांना या ठिकाणी सेलिब्रेशन करता यावं यासाठी खास सेल्फी पॉईंट्ससुद्धा तयार करण्यात आले आहेत. ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी लोक कालपासून गर्दी करत आहेत.


मुंबईतल्या कुर्ला येथील होलिक्रॉस चर्चलाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर, मध्यरात्रीच्या मासलाही (प्रार्थना) मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव एकत्र आलेले दिसले. प्रार्थनेनंतर सर्वांनी नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर, येशूच्या जन्मसोहळ्याचे नयनरम्य देखावे पाहण्यासाठी लहानग्यांनी गर्दी केली होती.


वसई भागात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती लोक राहतात. त्यामुळे वसईत नाताळचा वेगळाच जल्लोष पाहयला मिळतो. नाताळनिमित्त संपूर्ण वसई सजली आहे. प्रत्येक घरात येशूच्या जन्माचा आनंद साजरा केला जात आहे. प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना काल रात्री झाली. प्रत्येक चर्चमध्ये धार्मिक उत्सव तर प्रत्येक घरात आकर्षक रोषणाईने वसई-विरारचा परिसर झगमगून गेला आहे.


प्रभू येशूच्या आगमनाची पहिली प्रार्थना काल रात्री 10.20 ला सुरु झाली. वसईतील सर्व ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. त्यानंतर धार्मिक पध्दतीने मिसा (प्रार्थना) झाली. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाची गीते गायली गेली.