मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. त्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. आता या मोहिमेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जे जे महाविदयालयातील मित्रांनी देखील पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतःहून काही आकर्षक डिसप्ले बनवून या कोरोना जनजागृती मोहिमेत आपला सहभाग नोंदवला आहे. सध्या ही मोहीम सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ही मोहीम संप्रेषण तज्ज्ञ भूपाल रामनाथकर यांनी सुरू केली आहे. या मोहिमेत आता संपुर्ण महाराष्ट्रातील डिझाईनर सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझाईनर्सने देखील आपला सहभाग नोंदवला आहे. येत्या काही दिवसांत ही मोहीम कोरोना व्हायरस पेक्षाही अधिक वेगाने पसरेल असा विश्वास रामनाथकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
रामनाथकर म्हणाले की, सध्या कोरोना व्हायरस विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगवेगळ्या उपाय योजना करत आहेत. ते जनतेला वारंवार आगामी धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अजूनही काही नागरिक रस्त्यांवर फिरत आहेत. ही बाब लक्षात घेत आम्ही जे जे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यानी मिळून कोरोना विरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यासाठी स्वतःहून काही आकर्षक डिसप्ले तयार केले आणि जनजागृती मोहिमेला सुरुवात केली आहे.
आता ही मोहिम फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर जोर धरू लागली आहे. लवकरच ही मोहीम व्यापक रूप घेईल. या मोहिमेसाठी #Art4corona हा हॅश टॅग वापरण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ पिवळ्या रंगाचा वापर करून कोरोनासारख्या आजारापासून वाचण्यासाठी काय करावं किंवा या आजारामुळे काय होऊ शकतं याबाबतची माहिती देणाऱ्या छोट्या छोट्या ओळी लिहायच्या आहेत. सध्या जे जे महाविद्यालयातून पास झालेले अनेक विद्यार्थी या हॅश टॅगचा वापर करून वेगवेगळे टेंपलेट तयार करत आहेत. दिग्दर्शक रवी जाधवने देखील नुकतच एक टेंपलेट ट्विटरवर शेअर केलं आहे. यात ' आपल्या घरी राहणार की देवा घरी जाणार? असं मीम लिहिण्यात आलेलं आहे.
संबंधित बातम्या :