मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा काल पार पडली आहे. त्यानंतर आज महायुतीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा आज पत्रकार परिषदेत मांडलं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला, त्याचबरोबर वारंवार विरोधक टीका करतात त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Ladaki Bahin Yojana) टच केला तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होईल असंही शिंदे यावेळी म्हणालेत.
विरोधक म्हणतात, आम्ही सत्तेत आलो तर पोलखोल करणार, महायुतीने आणलेल्या सर्व योजना बंद करणार, पोलखोल करणार, जेलमध्ये टाकणार, तुमची पोलखोल यापुर्वीच झाली आहे, असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. हे खुलेआम बोलायला लागले, त्यांच्यात जेलसी निर्माण झाली आहे. त्यांच्या अशा बोलण्याने लोक त्यांच्या विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला. तर त्याचा कार्यक्रम झाला समजा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार. आमच्या लाडक्या बहीणी (Ladaki Bahin Yojana) हे ऐकून घेणार नाहीत. आम्ही त्यांना सांगितलंय केंद्र सरकार आणि आम्ही मिळून आमच्या बहिणींना लखपती बनवणार आहोत, त्यासाठी आम्ही काम करतो आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
तर करेक्ट कार्यक्रम होईल...
लाडकी बहीण योजनला मोठा प्रतिसाद आहे. सर्व लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या पाठिशी आहेत. ही योजना गेम चेंजर झाली आहे. मात्र, विरोधक ही योजना (Ladaki Bahin Yojana) बंद करण्यासाठी कोर्टात जात आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं शिंदे म्हणालेत.
आज महायुती सरकारचा रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर ठेवलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रिपोर्ट कार्ड देण्यासाठी धाडस लागतं. काम करावं लागतं. आम्ही प्रचंड कामं केली. दोन, अडीच वर्षांत तब्बल 900 निर्णय घेतले. तुमच्यात हिंमत असेल तर मग होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणr असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.