ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने पोखरण रोड नं 2 वसंत विहार मधील सर्व्हिस रोडवर एक छोटं उद्यान तयार केलं. त्यामध्ये बालगोपाळांमध्ये लोकप्रिय कार्टून 'छोटा भीम' आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांची टीम तैनात करुन पालिका प्रशासनाने सुखद धक्का दिला. मात्र बाळगोपाळांचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण छोटा भीमच्या टीममधील एका सहकाऱ्यांचं अपहरण झालं.

पोखरण रोड नं 2 येथील सर्व्हिस रोडवर पालिकेच्या वतीने बालगोपाळांसाठी तयार करण्यात आलेल्या उद्यानात छोटा भीमच्या टीमची प्रतिकृती लावल्यानंतर चिमुरड्यांना आकर्षण वाटलं. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या उद्यानापेक्षा जास्त पसंती लाखो रुपयांच्या छोटा भीम टीमच्या प्रतिकृतीने मिळवली. छोटा भीमसोबत चुटकी, कालिया, घोलू, राजू आणि जग्गू यांच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या.

प्रतिकृतीच्या बाजूला बसून चिमुरडे फोटो काढत होते. कालांतराने या छोटा भीमच्या टीममधील जग्गूचं अपहरण झालं. याची साधी पालिका प्रशासनाला माहितीही नाही. तब्बल दहा महिने उलटले तरीही बेपत्ता पुतळ्याचा शोध लागला नसल्यामुळे बालगोपाळांमध्ये नाराजीचा सूर आहे. याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम यांनी दहा महिन्यांपूर्वी पालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन तक्रार केल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नसल्याचं चित्र आहे. अपहरण झालेला जग्गू अद्यापही छोटा भीमच्या टोळीत पुन्हा दिसला नाही. याबाबत उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळालेला नाही.