मुंबई : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाचे काम 8 वर्षा नंतर देखील सुरु झाले नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे आक्रमक झालेत. संभाजीराजे यांनी चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला अशी हाक दिली आहे. छत्रपती संभाजीराजे आज मुंबईत अनोखे आंदोलन करणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारचे हेच का अच्छे दिन? असे म्हणत संभाजीराजेंनी एल्गार केलंय. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केले जाणार आहे.


काही वेळातच संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील युनिव्हर्सिटी जवळून या रॅलीला सुरुवात होणार असून याठिकाणी कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा नेरुळ येथे जमला असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यापुढे फसव्या आश्वासनांची पोलखोल स्वराज्य पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य पक्षाकडून देण्यात आला आहे.


संभाजीराजे यांची पोस्ट चर्चेत


छत्रपती संभाजीराजे यांनी समाजमाध्यमावर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यात म्हटले होते की, #चलो_मुंबई... अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…, असे त्यांनी म्हटले होते. 






स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना


दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून मुंबईत दाखल होत आहेत. नाशिकसह विविध जिल्ह्यातून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबई कडे रवाना झाला आहे. या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आंदोलकाना अडवण्याची तयारी 


आंदोलक गेटवे ऑफ इंडिया परिसरात येऊन त्यानंतर बोटीने समुद्रात जाणार असल्याने पोलिसांनी डीजी ऑफिस समोरच आंदोलकाना अडवण्याची तयारी केली आहे. स्वतः या परिसरातले डीसीपी प्रवीण मुंडे उपस्थित असून स्थानिक पोलिसांसोबतच राज्य राखीव पोलीस दल शीघ्रकृती दलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.


आणखी वाचा 


Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!