मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी फेसबुकद्वारे संवाद साधण्याची शक्यता आहे. सुटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त होणार आहेत.
मुंबईत गर्दी टाळण्यासाठी छगन भुजबळांनी फेसबुकचा पर्याय निवडल्याची माहिती आहे. छगन भुजबळ त्यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरुन उद्या फेसबुक लाईव्ह करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि आमदार पंकज भुजबळ यांनी केईएम रुग्णालयात जाऊन छगन भुजबळांची भेट घेतली. आपल्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. त्यामुळे ते पुढील निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अगोदर कुटुंबीयांची भेट घेणार आणि मग कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, असं भुजबळ यांनी सांगितलं.
सुटकेची प्रक्रिया पूर्ण
छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुरुंग अधीक्षकांनी केईएम रुग्णालयात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून अटकेत होते.
हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते आता डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भुजबळांची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया
''केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,'' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.