हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची कागदोपत्री सुटका बाकी होती. अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. भुजबळ सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते आता डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज घेऊन घरी जाऊ शकतात. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भुजबळांची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया
''केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,'' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
या अटींवर भुजबळांना जामीन
तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत जामीन मंजूर करण्यात आला. भुजबळांना पाच लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.
छगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्या्यालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ अटकेत होते. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी होती.
बुधवारी न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामीनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती.
संबंधित बातम्या :