मुंबई : चेंबुरमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा टाकण्यात आला आहे. नवाब मलिक आणि संजय दीना पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याचं चित्र आहे.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मध्यस्थीने गोळीबार प्रकरण मिटवण्यात आलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर पहिल्यांदाच नवाब मलिक आणि संजय दीना पाटील समोरासमोर आले आहेत.

विशेष म्हणजे पक्षासाठी एकत्र काम करण्याची तयारी दोघांनी दाखवली असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांतील वादावर अखेर पडदा पडल्याचं समोर आलं आहे.

अंगरक्षकाकडून पोलखोल

चेंबुरमध्ये झालेल्या सभेत गोळीबार झालाच नसल्याचा दावा नवाब मलिक यांच्या अंगरक्षकाने केला होता. 'संजय पाटील आणि त्यांचे 10 ते 12 कार्यकर्ते स्टेजवर आले. यावेळी पाटील यांनी मलिक यांची भेट घेण्याचा इरादा व्यक्त केला. त्यावेळी मी त्यांना रिव्हॉल्व्हर घेऊन तुम्ही मलिक साहेबांना भेटू शकत नाही, असं सांगत मलिक यांना डाव्या बाजुला नेलं'  असं अंगरक्षकाने जबाबात सांगितलं.

'घटना घडली त्यावेळी संजय पाटील किंवा त्यांच्या सरकारी अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार झाला नाही. किंबहुना सभागृहात कोणताही फायरिंगचा आवाज मी ऐकला नाही' असा दावाही नवाब मलिक यांच्या अंगरक्षकाने केला आहे.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतल्या चेंबूरमध्ये 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत होतं.

संजय दिना पाटलांच्या आजुबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याची दृश्य कॅमेऱ्यानं टिपली. याच कार्यक्रमात संजय दिना पाटील यांनी गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केला होता.

मुंबईतल्या चेंबूरमध्ये 141 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु होता. त्यावेळी संजय दिना पाटील 7 ते 8 बंदुकधाऱ्यांसह आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केल्याचा आरोप नवाब मलिकांनी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना केला.

चेंबूरमधील मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी नवाब मलिक आणि संजय दिना पाटलांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. तसंच राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांना अटक झाली असून 4 जण ताब्यात आहेत.

नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तित हेव्यादाव्यांचं अतिशय किळसवाणं रुप चव्हाट्यावर आल्याने या घटनेचा अहवाल मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना दिला.

या प्रकरणी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आरोप फेटाळले होते. नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडे तलवार आणि चॉपर सारखी हत्यारं होती, असा पलटवार संजय दिना पाटलांनी केला होता.

संबंधित बातम्या :


चेंबुरच्या सभेत गोळीबारच नाही, मलिक यांच्या अंगरक्षकाचा दावा


राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार