मुंबई: कारागृहात कशाप्रकारे जेवण मिळतं हे तुम्ही अनेक हिंदी चित्रपटात बघितलं असेल. मात्र, लवकरच कारागृहातील कैद्यांना जेवणाच्या ताटात पक्वान्न मिळणार आहेत. कारण कैद्यांच्या जेवणाचा मेनू ठरवण्यासाठी खास जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूरची मदत घेतली जाणार आहेत.


जेलमधल्या जेवणाच्या रांगेत, कैद्यांची होणारी फाईटिंग हिंदी सिनेमासाठी नवीन नाही. मात्र हिंदी फिल्म दिग्दर्शकांना, भविष्यात असे सीन शूट करण्याची संधी कदाचित मिळणार नाही. कारण खऱ्याखुऱ्या कारागृहात जेवणावरून भांडण होण्याची शक्यता कमीच आहे. आता कैद्यांचा जेवणाचा मेनू आता पूर्णपणे बदलला जाणार आहे.

कैद्यांना जाड्या भरड्या आणि सुक्या चपात्यांऐवजी मऊसुत चपात्या मिळतील. पाण्यासारख्या वरणाऐवजी, चविष्ट आमटी किंवा तत्सम पदार्थ सर्व्ह केला जाईल. कैद्यांच्या ताटात बेचव भाजीऐवजी रुचकर आणि पौष्टिक भाज्या दिसतील. एवढंच नव्हे तर जेवणासाठी कैद्यांना स्टीलच्या ताटाऐवजी प्लॅस्टिकची आकर्षक प्लेट दिली जाईल

येत्या काही दिवसात आर्थर रोड कारागृहात हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. विशेष म्हणजे कारागृहातल्या कैद्यांचा मेनू ठरवण्यासाठी जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची मदत घेतली जाणार आहे.

बरं... कारागृहात कैद्यांनाच जेवण तयार करावं लागतं. मात्र, या पायलट प्रोजेक्टनुसार चपात्या बनवण्यासाठी कारागृहात अद्ययावत मशिन बसवण्यात येणार आहे. त्यामुळं चपात्या लाटण्यापासून कैद्यांची कायमची सुटका होणार आहे.

कारागृहात मिळणाऱ्या थंड जेवणाबाबत कैदी तक्रार करतात. त्यावरही प्रशासनानं तोडगा शोधून काढला आहे. कैद्यांना पाहिजे तेव्हा गरम जेवण मिळावं म्हणून हॉटपॉटचा वापर केला जाईल. शिवाय कैद्यांना बुफे पद्धतीनं जेवण मिळेल.

आता इतकी सरबराई जर जेलमध्ये होऊ लागली, तर जेलमधील वास्तव्याला शिक्षा आणि आर्थर रोडच्या रहिवाशांना कैदी म्हणायचं का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.