मुंबई  : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत.

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी  तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सांगतानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.

पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

मंत्रालयात दुषित पाण्यामुळे शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलड्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला होता. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंत्रालयातील 100 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी उलट्या आणि जुलाबाच्या त्रासामुळे मंत्रालयातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मंत्रालयामध्ये हजारोच्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून रोज वैयक्तिक व सार्वजनिक कामासाठी सर्वसामान्य लोक मंत्रालयात येत असतात. तरीही पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.