नाशिक: संघर्षयात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत दोन शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा इशारा दिला. संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विरोधक नाशिकजवळच्या पिंपळगाव बसवंत इथं पोहोचले. यावेळी ही घटना घडली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचं बसवंत येथं भाषण सुरु होतं. तेव्हा दोन शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. त्यानंतर विखेंनी त्यांना व्यासपीठावर बोलावलं. त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दोर होते. कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकऱ्यांनी दिला.
'सरकार कर्जमाफी देत नसेल तर, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या.' अशा घोषणा या शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, व्यासपीठावर आल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांच्या हातून विषाची बाटली आणि दोर कार्यकर्त्यांनी काढून घेतले. त्यानंतर स्टेजवरुन बोलताना शेतकऱ्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी दोनही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधकांनी त्यांची सुटका करण्यात यावी यासाठी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी, विखे-पाटलांची जहरी टीका