मुंबई : प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी 'मी तुला बघून घेईन' अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.


कपिल पाटील यांचा नेमका आरोप काय?

“प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याचा खुलासा सरकारने करावा. या विचारधारेचं समर्थन करतं की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. ते स्पष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा सभागृहात भाषा वापरत होते, खेदजनक आणि वेदनाजनक होती.”, असे कपिल पाटील म्हणाले.

“चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असेही कपिल पाटील म्हणाले.

विधीमंडळात घडलेल्या या घटनेचे स्वत: सभापती आणि सर्व आमदार साक्षीदार आहेत. त्यामुळे इतकं गंभीर वर्तन करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आत्मपरिक्षण करावं आणि दिलगिरी व्यक्त करावी असंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

इतकंच नव्हे तर लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मात्र अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार असेल तर ते अधिक गंभीर असल्याचं कपिल पाटील म्हणाले.

दरम्यान, कपिल पाटील यांच्या आरोपांवर अद्याप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे चंद्रकात पाटील काय बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.