मुंबई : अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दालातून बडतर्फ अधिकारी सचिन वाझेला दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगानं हे समन्स जारी केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. याप्रकरणी आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत वाझे यांच्या नावानं हे समन्स जारी करण्यात आलं आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीच टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप यातनं केलेला आहे. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत कोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.


मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चांदीवाल यांनी 30 मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, सचिन वाझे यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक होतं. मात्र वाझे हे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यानं हे प्रतिज्ञापत्र सादर अद्याप सादर झालेलं नाही. त्यामुळे आयोगानं वाझेंच्या नावानं दुसरं समन्स बजावलं आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत, ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज यापूर्वीच सदर केलेला आहे.


सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात


मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. याप्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. तर मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :