Maharashtra Rain Updates: मुंबई : राज्यभरात (Maharashtra News) मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली आहे. अनेक भागांत तर पावसाची संततधार (Rain Updates) पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत परतल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक भागांत पावसानं हजेरी लावली. त्यानंतर काही भागांत पावसानं पुन्हा दडी मारल्याचं पाहायला मिळालं. अशातच बुधवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अशातच आता पुढचे 2 ते 3 तास मुंबई, नवी मुंबई  ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 






हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी ट्वीटवरुन दिलेल्या माहितीनुसार, आज, 19 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर (वसई, वाडा), रायगडसह नवी मुंबई पनवेलमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


यंदा देशात पावसाचं लवकर आगमन झालं. मात्र, सुरुवातीचा एक दिवस झालेला पाऊस वगळता मुंबईवर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील उकाडा (Mumbai Temperature) अजूनही कायम असून मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने जवळपास तळ गाठला आहे. परिणामी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सध्या पाणीकपात लागू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चांगला पाऊस व्हावा, अशी आस लागली आहे. 


पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.