मुंबई : मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांना एक आश्चर्यकारक आणि सुखद अनुभव आला. तब्बल 26 वर्षांपूर्वी राऊळ यांची हरवलेली सोनसाखळी पोलिसांमुळे सापडली आहे.

शुभा राऊळ यांनीच आपल्याला आलेला अनुभव कथन केला. मुंबईतील पोद्दार कॉलेजच्या बसस्टॉपवर एका मारुती कारमधून आलेल्या दोन जणांनी त्यांची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन खेचली होती. त्यानंतर बरेच हेलपाटे मारल्यानंतर काही उपयोग होत नाही असं बघून माजी महापौर शुभा राऊळ यांनीही चेन मिळण्याची आशा सोडून दिली.

आज अचानक पोद्दार महाविद्यालयातूनच मिळालेल्या एका पत्रानं त्यांना ती चेन परत मिळाली असल्याचं कळलं. ही सोन्याची चेन विक्रोळी मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्यांच्या हवाली केली. केवळ पत्ता बदलल्यामुळे अनेक वर्ष ही चेन मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पडून होती. मुंबई पोलिस विभाग आणि कोर्टाचे शुभा राऊळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.


मुंबईत दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडतात. त्यापैकी काही चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर काही सोनसाखळ्यांचा शोध मात्र लागलेला नाही. त्यामुळे न्याय मिळतो पण मुंबईच्या प्रथम नागरिकाचं स्थान भूषवलेल्या माजी महापौरांनाही त्याच्या प्रतीक्षेत २६ वर्ष वाट पहावी लागते, तिथे सामान्यांची काय कथा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत असलेल्या शुभा राऊळ यांनी 2007 ते 2009 या कालावधीत मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं. त्यानंतर शुभा राऊळ यांनी मनसेमध्ये प्रवेश केला, मात्र अल्प कालावधीतच, म्हणजे गेल्या वर्षी जानेवारीत त्यांनी शिवसेनेत पुनरागमन केलं.